Thursday, July 9, 2020

Wednesday, May 13, 2020

आकाश दर्शन

आकाश दर्शन
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था
इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती
आकाशदर्शन कार्यक्रम करणाऱ्या संस्थांविषयी हा वेगळा धागा काढत आहे.
१) खगोलमंडळ -Head office - शीव, साधना विद्यालय ,बुधवारी. नोंदणीकृत सहकारी संस्था.
शाखा - मो ह विद्यालय ,ठाणे आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली, होत्या. यांचे आकाशदर्शन कार्यक्रम वांगणी - पाटोळे बाईंच्या फार्मवर. आठ इंची पितळी दुर्बिण आहे.
२) हेमंत मोने यांचे कार्यक्रम मुरबाडच्या अलिकडे दहा किमिवर हिंदू सेवा संघाची मोठी जागा आहे तिथे होतात.
३) मराठी विज्ञान परिषद ( चुनाभट्टी मुंबई कुर्लाजवळ) - यांचेही कार्यक्रम हिंदू सेवासंघ जागेत होतात. नोंदणीकृत सहकारी संस्था.
४) बोरिवली येथे एक नवीन संस्था टिआइएफआर येथून निवृत्त झालेल्या लोकांनी चालू केली आहे. जरा सधन संस्था आहे. C -8 दुर्बिण आहे. मान्यवर तज्ञांना भाषणांसाठी बोलावतात.
५) पुण्याची ज्योतिर्विद्या संस्था कार्यक्रम करतेच.
हेड ओफिस - टिळक स्मारक मंदिर. नोंदणीकृत जुनी सहकारी संस्था.
६) नांदेड येथील एका कॅालेजात C -8 वर वेधशाळा बांधली आहे. ( पृथ्वीच्या अक्षास समांतर दुर्बिण बसवलेली असते. )अभ्यासासाठी उपलब्ध.
६) पुणे यूनिवर्सिटी आवारात 'आयुका' नावाची युजिसी ग्रांट ( केंद्रिय मदत) मिळणारी संस्था आहे तिथे मोठ्या टेलिस्कोप विद्यार्थ्यांना बनवायला शिकवतात, करवून घेतात. श्री परांजपे आणि विनया कुलकर्णी बरेच वर्ष मार्गदर्शन करत होते.
७) नेहरू प्लानेटेअरिअम, वरळी मुंबई येथे विविध कार्यक्रम होत असतात. भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम ते नेहरु प्लॅनेटेरिअम / तारांगण ची बस असते . रेसकोर्सनंतरचा 'नेहरु विज्ञान केंद्र' हा स्टॅाप वेगळा आहे. तारांगण हा शेवटचा स्टॅाप.
मिपाकर आणि वाचक यांना , त्यांच्या मुलांना हा छंद वाढवायचा झाल्यास माहिती मिळावी यासाठी प्रयत्न आहे. वरील संस्थांची अधिक माहिती, फोन नंबर ( कार्यक्रम अपडेट्स) अवश्य द्यावी. अनुभव लिहावेत.

मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
मेळघाट २: नरनाळा किल्ला

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नरनाळा किल्ला पाहून साडेसहाच्या आसपास वनखात्याच्या रेस्टहाऊस वर परत आलो, आता निघायचे होते ते मचाणावर, एक रात्र मुक्कामाला.

मचाणावरील मुक्कामाचे बुकिंग सरकारच्या मॅजिकल मेळघाट ह्याच संस्थळावरुन करता येतं. येथे कच्ची आणि पक्की मचाणं मोठ्या प्रमाणावर आहेत. बुद्धपौर्णिमेच्या आसपास बरीच कच्ची मचाणं मेळघाटातल्या कोअर भागात उभारली जातात. आम्ही मेळघाटात बुद्धपौर्णिमे

Sunday, May 3, 2020

Tuesday, March 10, 2020

कर्नाटका २

गाभा :-
कर्नाटक राज्यातील  समुद्र आणि सह्याद्री मधली पर्यटन स्थळे बरीच आहेत आणि विखुरलेली आहेत. ती सर्व एकाच सहलीत करणे अशक्य म्हणून दोन भागांत करायचं ठरवलं होतं. समुद्र किनाऱ्याने कोकण रेल्वे जाते आणि काही स्टेशन्सला एक्सप्रेस गाड्या थांबतात. किनाऱ्यावरच्या काही शहरांतून सह्याद्री पर्वत चढून जाणारे मुख्य रस्ते आहेत आणि त्या मार्गांवर पर्यटनासाठी जागा ( बहुतेक देवळेच ) आहेत. नेचर रिझॉट्सही आहेत. एका मार्गाने वर गेलो तर दुसऱ्या मार्गावरची पाहता येत नाहीत. त्यामुळे थोडा सैल आराखडा बनवला. अगोदरच्या 'गोकर्ण, बनवासी' या पोस्टमध्ये उत्तर कर्नाटकातली गोकर्ण, शिरसी, बनवासी आली आहेत.

१) जाण्याचे रेल्वे तिकिट बुकिंग 'उडुपी' चे (12619 मत्स्यगंधा एक्सप्रेस)

२) येण्याचे रेल्वे तिकिट बुकिंग 'कडुर' ते दादर. (11022, शरावती एक्सप्रेस).

२-७ मार्च २०२०.मध्ये तीन दिवस हॉटेल मुक्काम पण बुकिंग नाही. यावर निघालो.
ठिकाणे :- उडुपी स्टेशन - श्रृङ्गेरी(१) - चिकमगळुरु(२) - कडुर स्टेशन परत.
प्रवासाची सुरुवात वेळेत होऊन उडपीला सहाला उतरलो. स्टेशनबाहेर प्रीपेड taxi, खाजगी बसेस, ओटो होत्याच. बसने तीन किमिवरच्या मोठ्या बस स्टँडला(खाजगी) पोहोचल्यावर तिथून फक्त अर्धा किमि अंतरावरचा श्री कृष्ण मट् ( मठ) गाठला. वाटेत मोठी झाकपाक दुकाने आहेत. अजून उघडायची होती. शहर जागे होत होते. स्वच्छ. मठ म्हणजे देऊळ आणि तेही कृष्णाचे म्हणजे दिवसांत पंधरा वीस वेळा उघडणार बंद होणार हे अपेक्षितच. बाहेर आवारात दोन रथ उभे.
 फोटो १

रथ - उडुपी श्री कृष्ण मट्
 मटा'त आतमध्ये दर्शनासाठी एक दोनफुटी चौकटीत चार इंचाच्या नऊ खिडक्या. त्यातून तो शाम जेवढा दिसेल तेवढा पाहिला. ( = किटकीदर्शन) संपलं. ( सकाळी ५ ते रात्री ९ या वेळात अधूनमधून दर्शन करता येते. मठाच्या मोठ्या आवारातच असलेली चंद्रमौलिश्वर आणि अनंतेश्वर ही हजार वर्षांपूर्वीची देवळे मात्र सावकाश पाहता येतात.  काही फारिनर तिथे राहिलेले दिसले. ते बहुतेक संस्कृत कॉलेजात शिकत असावेत. उडपीमध्ये मालपे आणि कौप समुद्रकिनारे पाच दहा किमिवर आहेत. पण तिकडची मजा घ्यायची तर एक दिवस राहून संध्याकाळी जावे लागणार .(हॉटेल्स आणि रेस्टारंटस खूप) तसा अमचा समुद्र पाहण्याचा उत्साह चिमुटभरच. वेळेत श्रृङ्गेरी गाठणे गरजेचे.
परत बस स्टँडला आलो. एकूण तीन बाजुबाजूला आहेत. मोठा खाजगी बसेसचा, एक सिटी बसेसचा खाजगी आणि एक छोटा कर्नाटक एसटी उर्फ KSRTCचा त्यालाच रेड् बस स्टँड म्हणतात हे कळलं. आता श्रृङ्गेरी जाण्यासाठी आगुंबे मार्गे शिमोगा ( आता शिवमोगा नाव) बस असतात त्याने जायचे आणि आगुंबेला बस बदलायची. किंवा उडुपी - कारकला बसने जाऊन तिथे बस बदलायची. दोन पर्याय - आगुंबे पाहता येईल किंवा कारकला - मूडबिद्री - वेणूर ही तीन जैन बसदी ( = मंदिरे ) पाहण्यासाठी कारकला येथे मुक्काम करणे. यासाठी एक दिवस वाढवावा लागेल. हे एक 'उरकणे' पर्यटन असल्याने आगुंबे मार्गे रेड् बसने (  हिरव्याही बऱ्याच असतात !)निघालो. जाताजाता आगुंबे काय आहे हे ओझरते कळेल. पाच किमिवरच्या मणिपाल या प्रसिद्ध मेडिकल कॉलेजच्या गावानंतर बस हळूहळू सह्याद्रीचा घाट चढू लागली. इकडे हे एक बरं आहे सह्याद्रीचा पश्चिम उतार अगदी समुद्राला जवळ आहे. दाट झाडी वाढू लागली ( सोमेश्वरा गावापासून संरक्षित अभयारण्य सुरू होते)आणि दीड तासाने ५४ किमि  पार करून आगुंबेत (550 मिटरस उंची) पोहोचलो. दुतर्फा खाजगी प्रापर्टीज आणि कुंपण. कुठेही आत शिरलं असं करता येणार नाही. साप पाळणाऱ्या/संशोधन करणाऱ्या विटाकरचे इथे नागराज /किंग कोब्रा केंद्र आहे. वाटेत काही नेचर रिझॉट दिसले त्यात राहून भटकता येईल. (खाजगी हॉटेल्स नाहीत.) बस बदलण्यासाठी उतरलो. मोठी फुलपाखरे स्टँडलाही उडताना दिसत होती. लवकरच  बसने २४ किमिवरच्या श्रृङ्गेरीला (630 मि उंची) चाळीस मिनिटांत पोहोचलो.

श्रृङ्गेरी बस स्टँडजवळच एक हॉटेल दिसले त्यात रुम घेऊन जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. आराम करून आदि शंङ्कराचार्यांचे  शारदापीठ पाहायला निघालो. तिनशे मिटर्सवर आहे. प्रवेशाच्या गोपुराजवळच दोन मोठे भक्तनिवास आहेत. सर्व भाविक इकडेच राहतात. मोठ्या आवारात शारदांबा मंदिर ( २-४ बंद), विद्याशंकर मंदिर (१२-४ बंद) आणि तुंग नदीच्या पुलावरून पलिकडे जाण्याचा पुल (१२-४ बंद) आहे. नदीतल्या मोठ्या काळ्या माशांना खायला घालणे हा उद्योग पुलावरून छान दिसतो. विद्याशंकर मंदिरात (तेराव्या शतकातले) जे बारा खांब आहेत त्यावर बारा राशींची छोटी शिल्पे हे विशेष. मकर रास म्हणजे पाश्चिमात्त्य ज्योतिष पद्धतीतला मेंढाच आहे.  (फोटोला बंदी आहे.)बाहेरच्या भिंतीवरची शिल्पे पावसाने झिजलेली आहेत. नदीपलिकडच्या विस्तृत रम्य आवारात बऱ्याच इमारती आहेत त्यापैकी शेवटचे गुरुनिवास हे चारमजली उंच बिन खांबांचे छत असलेले सभागृह अप्रतिम. या परिसरात येण्यासाठी कारसाठी दुसरा रस्ता आहे. एक झुलता पूलसुद्धा आहे. एकूण छान. गोपुरासमोरच्या मोठ्या रुंद रस्त्यावर हॉटेल्स आणि रेस्टारंटस, बाजार आहे.
फोटो  २
पूल - तुंगा नदी, श्रृङ्गेरी शारदापीठ

फोटो  ३
गोपुर - श्रृङ्गेरी शारदापीठ

दुसरे दिवशी चिकमगळूरु'ला सकाळीच निघालो. हे शहर धार्मिक तसेच आणखी एका विशेष कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे भारतातील पहिली कॉफी लागवड इथे झाली. श्रृङ्गेरी सोडून रस्त्याने जाऊ लागल्यावर लगेच दोन्ही बाजूस कॉफीच्या बागा /वने दिसू लागतात.  केंद्रीय कॉफी बोर्डाची एक संशोधन संस्था आणि शाळा दहा किमिवर आहे. कॉफीची दोन तीन प्रकारची झाडे/झुडपे आहेत. काही बागांत पांढऱ्या शुभ्र फुलांनी झाडे बहरलेली आणि मंद सुवास पसरलेला. हा बहर म्हणे पाचसात दिवस टिकतो आणि त्यावर फळे धरायला सात ते नऊ महिने जावे लागतात. मग तोडणी. तरीच बागांत कुठे कुणी दिसत नव्हते.  कडेने काही सहा फुटी झाडांवर कॉफीची हिरवी, लाल फळे दिसली. इथली कॉफी झाडे उंच झाडांच्या ( सिल्वर ओक, निलगिरी )सावलीत वाढवतात. सहाशे ते बाराशे मिटरस उंचीवर. किती उंचीवर, सावलीत किंवा उघडी कॉफी वाढते यावर कॉफीचा स्वाद बदलतो आणि भाव मिळतो.  (बसमधून फोटो काढता  आले नाहीत.) दाट सावलीतून प्रवास सुरू असतो आणि सर्व ठिकाणी कुंपण आहे. फक्त ओढ्यात मोकळे. ओढे आता मार्च महिन्यातही वाहत होते! उघड्या उजाड चहामळ्यांपेक्षा कॉफी बागा बघायला सुंदर वाटतात. श्रृङ्गेरी ते चिकमगळूरु प्रवास ८८ किमीचा अडीच तासात संपतो आणि आपण सहाशे मिटरस उंचीवरून हजार मिटर्सवर येतो.
बस स्टँडच्या बाहेरच्या रस्त्यावर सर्व थरांतली हॉटेल्स ( go stays type, रुम आहे का विचारायचं आणि राहायचं) तसेच शाकाहारी/मासाहारी रेस्टारंट्सही बरीच दिसली. मग एका जवळच्याच हॉटेलात (मंजुनाथ) रुम घेतली. पटकन जेवण केले. आजचा अर्धा दिवस बाबाबुदनगिरी टुअर मिळाल्यास पाहणे आणि उद्याचा पूर्ण दिवस हळेबिडु - बेलूर आणि कॉफी म्युझियम पाहणे असा प्लान होता. हॉटेलवाल्याने सांगितले - " बाबाबुदनगिरी , माणिक्यधारा जीपने १९०० रु. झरी फॉल्स पाहिजे असल्यास २३०० रु. ते प्राइवेट प्रापर्टीत आहे. शेअरिंग स्वस्त पडेल." दोघांना परवडणारे नव्हते, बघतो म्हणालो आणि एसटी स्टँडच्या चौकशीवाल्यास डायरीत लिहून आणलेली ठिकाणे दाखवून बसेस आहेत का विचारलं.
"या ठिकाणी बस नाहीत पण  खाजगी बस बुदनगिरीला (B B HILLS )दिवसाला चार जातात, तिकडे बाहेर उभ्या असतात. "
म्हणजे अमच्या हॉटेलच्या दारातच! पण हॉटेलवाल्याने हे सांगितलेच नाही!
" बेलवडी'ला ही 'जावागल' बस जाते."
लगेच त्या बसने निघालो.
 तर तासाभरात पावणेतिनाला बेलवडी(३० किमी) स्टॉपला पावलो. तिथेच सरकारी पाटी दिसली वीरनारायण टेंपल आणि थोड्याच अंतरावरचे जुने देऊळ. चौऱ्यांशी खांबांवर सभामंडपाचे छत पेललेले भक्कम देऊळ. एक महिला पोलिस पहारेकरी ड्युटीवर होती. बेलवडी गाव छोटेसे, प्रत्येक घरात गाईम्हशीचा गोठा. एकूण छान सुरुवात.
फोटो  ४
वीरनारायण मंदीर - बेलवडी
 फोटो  ५
होयसाळेश्वर - हळेबीड पाटी

फोटो  ६
 बसदी पाटी, हळेबिडु.

फोटो ७
होयसाळेश्वर चिन्ह - बेलूर

 गूगल म्यापमध्ये हळेबीडु अगदी जवळच दिसत होते. शहाळं पितानाच विक्रेत्याला विचारले. "बस येईल पाच मिनिटांत, पुढच्या चौकात उतरा आणि ओटो/बस बदला." आणि तसेच झाले. अर्ध्या तासात हळेबीडात आलो. ( दोन किमिटरवर हळेबिडु फाटा/क्रॉस आणि तिथून सात किमि)
प्लान बदलला गेला होता. साडेतीन झालेले. विचार केला हळेबीड पटापट उरकले तर बेलूरसुद्धा होईल. भराभर फोटो काढत सुटलो. हे  होयसाळेश्वर देऊळ अर्ध्या तासात उरकणे हा घोर अपमान होता.
फोटो ८ 
होयसाळेश्वर शिल्पे- हळेबीड
 पुढच्या दोरासमुद्र (/द्वारसमुद्र) तलावाकडे न जाता तिनशे मिटर्स अंतरावरच्या जैन बसदीकडे ( जैनांचे देऊळ) गेलो. इथे फारशी शिल्पे नाहीत पण अतिमहत्त्वाचे शिलालेख पाचसहा आहेत. आतमध्ये दहाफुटी अखंड मूर्ती. इकडे कुणी फिरकत नाही.

फोटो  ९
बसदी लेख, हळेबिडु.
 परत हळेबीड होयसाळेश्वर समोरच्या बस स्टँडवरून बेलूर बस लगेच मिळाली. सोळा किमि अंतर आहे. उतरल्यावर तडक बेलूरचे चन्नकेशवा मंदिर गाठले. सवापाच झालेले. ही मंदिरे सूर्योदय ते सुर्यास्त उघडी असतात. चपला काढतानाच कळलं साडेसातपर्यंत बघता येईल. हुश्श. मग निवांतपणे पाहिले. दोन्ही होयसाळ राजांनीच बांधली. जेव्हा बाहेर पडलो तेव्हा शहाळं घेतलं. साठीची विक्रेती बाई होती. तिने सपासप शहाळं सोलून दिलं. पुढेही स्त्रियाच विकत होत्या. मग स्टॉपवरून हसन ते चिकमगळुरु बसने (१२ किमि) परत निघालो. या बस सतत धावतात. हळेबिडु आणि बेलूरचा समावेश हसन जिल्ह्यात असला तरी चिकमगळूरुकडून अधिक जवळ आहे.
फोटो  १०
गरुड - बेलूर
 फोटो ११
त्रिविक्रम - बेलूर






फोटो १२ 
बेलूर पाटी
 फोटो  १३
बेलूर शिल्प.
 फोटो १४
होयसाळेश्वर - हळेबीड शिल्पे
 फोटो १५
होयसाळेश्वर - हळेबीड शिल्पे

 आजचा अर्धा दिवस वसूल झाला. आता उद्या फक्त पर्वतावर. सकाळीच आठ वाजता तयार होऊन नाश्ता करून B B HILLS जाणाऱ्या बसमध्ये बसलो. साडेआठला सुटणार म्हणता नऊला सुटली कारण प्रवासी नव्हते. दोन युवक बसलेले त्यांना हिंदी येत होते.
" और पाच दिनों बाद बाबा का उरुस है तब बस के उपर दस लोग बैठते हैं! बसे टैम पर चलती हैं।"
तर बस निघाली आणि पाच किमिनंतर तारिकेरी रस्ता सोडून वर घाटात चढू लागली. अरुंद पण पक्का चांगला रस्ता आणि पुन्हा कॉफी मळे सुरू झाले. होम स्टे हॉटेल्स अधुनमधून दिसत होती. २४ किमिवर अथिरुंडी  धबधबा रस्त्याकडेच दिसतो आणि बरेच लोक भिजत होते. यासाठी हायर्ड जीप/कारने यावे लागेल. बसमधूनच पाहावा लागला. मार्च महिना असुनही पाणी जोरात पडत होते. इथूनच मुलायनगिरी शिखराकडे जाणारा रस्ता फुटतो. मग अथिरुंडी गाव व नंतर सहा किमीवर बाबाबुदनगिरी माथा. हे तीस किमि पार करून आपण १६५० मिटर्स उंचीवर येतो. इथे बाबाची समाधी आहे. बाबा बुदन नावाचा अवलिया १४५० च्या आसपास अरब देशात गेलेला. तिथे आफ्रिकेतील इथिओपियातील कॉफी मिळत असे. ते लोक पक्के हुशार. कॉफी बिया कुटून किंवा भाजूनच
देत म्हणजे उगवणार नाहीत. बाबाने सात अस्सल बिया तिकडून दाढीत लपवून चिकमगळुरास आणून पेरल्या आणि इथे कॉफी आली. या गोष्टीला मान्यता मिळाली आहे. हा बाबा दत्ताचा अवतार आहे असेही  लोक समजत. इथे एका गुहेत तो राहायचा त्यात त्याची समाधी आणि पादुका आहेत. हिंदु, मुसलमान आणि कॉफी मळेवाले दर्शनास येतात. इथून पायी तीन किमिवर एक धबधबा/झरा आहे. माणिक्यधारा.गाडीचा सात किमिचा रस्ताही आहे.  तिथे जाऊन आलो. माथ्यापासून फक्त शंभर फुट खाली असूनही एवढे पाणी कुठून कसे काय येते हे आश्चर्य वाटते.

 फोटो १६ 
माणिक्यधारा - बाबाबुदनगिरी शिखर

 इथूनच समोरचे मुलयनगिरी शिखर समोर दिसते. आलेली बसच परत साडेबाराला निघणार होती ती एकला सुटली. त्याने परत येऊन जेवण करून रुमवर आराम केला. एकूण सह्याद्रीच्या या भागाची ओळख झाली. चार वाजता पुन्हा बाहेर पडलो आणि उरलेले ठिकाण म्हणजे 'कॉफी म्युझिअम' पाहायचे ठरवले. चौकशी करता "M G ROAD ला जा' हेच प्रत्येक जण सांगत होते. हा रस्ता पलिकडे जवळच होता. रस्ताभर दळलेल्या कॉफीचा सुगंध पसरलेला कारण कॉफी विकणाऱ्यांचीच बरीच दुकाने होती. तिथे प्रत्येक जण " इकडे कुठे कॉफी म्युझिअम नाहीच" हे ठणकावत होता, किंवा 'पांडुरंग कॉफी' दुकानात विचारा सांगायचे. गूगल म्यापने आरटीओ ओफीस, जिल्हा परिषद जवळ दाखवले. ते दाखवूनही नाही म्हणाले. मग जवळच्याच पांडुरंगाला शरण गेलो. मालकच होता.
"कॉफी म्यझिअम?"
" तुम्हाला म्यझिअम कशाला हवे? त्यापेक्षा इथेच दोन किमिवर हिरेमगळूरुत ( = थोरली मुलगी) दोन देवळे आहेत तिथे जा. आजचा दिवस फार चांगला आहे, गुरुवार एकादशी. तिकडेच जा."
" बरं, संध्याकाळी जातो पण म्युझिअम आहे का?"
"आहे ना, हे पाहा" म्हणत त्याने एका मोठ्या गठ्ठ्यातून एक कागद ओढला. खरडकागद समजलो पण तो नकाशा होता! त्यावर मार्क करून हातात दिला.
पांडुरंग पावलाच.
मग लगबगीने ओटो करून तिथे पाच किमिवरच्या म्युझिअमला (१२०रु) पोहोचलो. ( नेटवरच्या माहितीनुसार दहा ते सात वेळ दिली होती. ) गेटवरच वाचमनने 'क्लोझ्ड' खूण केली. सहा वाजलेले. मग ओटोने परत न येता बसनेच (१२रु)परत आलो.  वैकुंठ गाठता आले नाही तरी दारापर्यंत गेलो हे सुद्धा विशेष. आजचा दिवसही छान गेला. उद्या फक्त आवरून चेकाऊट करून बसने कडुर स्टेशन (४० किमि) गाठणे आणि पावणेदहाची ट्रेन पकडणे एवढेच काम बाकी राहिले. शुक्रवार शेवटचा दिवस. गाडी एक तास उशिरा आहे ही सुवार्ता सकाळीच कळली होती. सातच्या शिमुगा बसने तासाभरात कडूर आले. आता या रस्त्याला फक्त सुपारी (=अरिका )आणि नारळाच्या बागा होत्या. कॉफी नाही. त्याला डोंगर उतार लागतो. छान रस्ता. बस स्टँडवरच्या क्यांन्टिनात नाश्ता केला. आतापर्यंत खाल्लेल्या मेदुवडा इडलीत इथेच सर्वात छान मिळाली. स्टँड आणि स्टेशन समोरासमोरच होते. अकरा वाजता गाडी आली आणि परतीचा प्रवास सुरू झाला तरी चिकमगळुरु (= धाकटी मुलगी), श्रृङ्गेरी आणि उडुपीचे विचार येत होते. कडुर -दावणगेरे -चिकजाऊर -हवेरी - हुबळी-धारवाड पर्यंतचा लोहमार्ग दुहेरी झाला आहे. धारवाड -अलनावर लोंडा - बेळगाव एकेरीच आहे. गाडीला उशीर झाल्याने इथे संध्याकाळ झाली. वळणेवळणे घेत हळूहळू जाताना बाहेर खूप मोर पाहता आले. हुबळी - धारवाडमध्ये स्टेशनातच धारवाड-पेढे खरेदी केले. ते खात ट्रिपची आठवण काढण्यासाठी.

फोटो  १७
पर्यटक नकाशा - चिकमगळुरु शहर
 फोटो  १८
पर्यटकांसाठी माहिती - चिकमगळुरु शहर
 फोटो  १९
पर्यटकांसाठी माहिती - कोस्टल नकाशा








माहिती देण्यात काही अधिक उणे झाल्यास लिहा. सूचनांचे स्वागत.

Saturday, January 11, 2020

गोकर्ण बनवासी

१)मुर्डेश्वर.


२) मरिकांबा , शिरसी.


३)फोटो
४) लेख, मधुकेश्वर, बनवासी.
५) वनवासी.
६)वनवासी.
७)वनवासी
८)वनवासी
९)लेख, मधुकेश्वर, वनवासी.
१०) वनवासी
११) वनवासी.
१२) वनवासी.
१३)वनवासी.
१४)वनवासी.
१५)रथ, गोकर्ण.

Sunday, July 15, 2018

करप्ट एसडी कार्ड उघडणे

जिस का फोन छोटा उस का भी बडा नाम है।
करप्ट एसडी कार्ड उघडणे
परवा एक मेमरी कार्ड स्मार्टफोनमध्ये " मेमरी कार्ड इज आइदर करप्ट / अनवेलबल" (  sd card is either corrupt or unavailable )
मेसेज झळकवू लागले.
सेट अप / फॅार्मॅट ? ( set up / format?)
त्यामध्ये १२-१३ जीबी फोटो/व्हिडिओ होते.
तर ते फॅार्मॅट न करता फोन बंद करून sd card काढून घेतले.
एक नोकिआचा जुना फोन  X2 - 00  आहे त्यात टाकून पाहिले. ते चालू झाले - म्हणजे ओपन झाले. या फोनला OTG support आहे. एक पेनड्राइव जोडले.
करप्ट कार्डाचे नाव बदली केले ते तात्पुरतेच झाले, पुन्हा परत NO NAME राहिले. आतले फोल्डर डिलीट होत नव्हते. - डिलीटेड हा मेसेज दिसायचा पण काहीच फरक पडायचा नाही.
फोल्डर कॅापी टु पेनड्राइव झाले( एकेक केले, मार्क ओल नाही) आणि सर्व फोटो/ विडिओ मिळाले.
आता काम तर झाले म्हणून हे करप्ट कार्ड परत स्मार्टफोनात टाकून फॅार्मॅट केल्यावर काहीच फरक पडला नाही. पुन्हा नोकिआ फोनमध्ये उघडते का पाहिले तर उघडले जात आहे. कार्ड पुन्हा वापरता येणार नाही परंतू फोटो - विडिओ मिळाले यातच आनंद.
एक सूचना - छोटे फोन एक कार्ड आणि एक एक्सटर्नल ड्राइव जोडल्यास ,डेटा ट्रानस्फरला बॅट्री फार खातात. दोन चार जीबी डेटा पाठवला की दहा मिनिटांत बॅट्री संपते. सावकाश करायचे चार्जर लावून किंवा थांबून.


Monday, April 16, 2018

रंग माझा वेगळा - रंगाशी दोन हात

आपलं घर स्वच्छ, टापटीप आणि सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या सौंदर्यात लाकडी - लोखंडी सामानासह घराच्या रंगाचाही मुख्य वाटा आहे. दिवसेंदिवस शहरांमध्ये मोठ्या इमारतीमधला आपला एक ब्लॅाक/फ्लॅट असतो आणि चित्रामधलं टुमदार स्वतंत्र घर ही कविकल्पना होऊ लागली आहे. बाहेरचा रंगही  कसा असावा हे आपल्या कक्षेबाहेरच गेलं आहे. आतल्या भिंतींचा रंग ठरवणे एवढेच उरले आहे. रंग काढायला झाला आहे हा विचार केव्हा चर्चेला येतो? घरामध्ये काही कार्य निघाल्यावर, सणासुदीच्या अगोदर,नवीन ब्लॅाक घेतल्यावर, केवळ पहिल्या रंगसंगतीचा कंटाळा आला म्हणून किंवा अगोदरचा रंग खराब झाल्यावर. कारण काहीही असो कोणता रंग द्यायचा आणि बजेट किती यासाठी इंटरनेटवर शोधणे, किंवा ओळखीपाळखीच्या लोकांना विचारणे सुरू होते. रंगाच्या आणि टुअरच्या बाबतीत कुणालाही विचारा "त्यांचा" माणूस किंवा निवड ही अल्टिमेटच असते. "मग अमुकवेळा दुसरीकडे का गेलात?" याचे उत्तर "तो अवेलबलच नव्हता हो." असो.
मुख्य विषयाकडे वळूया. रंगकामाचे दोन प्रकार पडतील - अ) कॅान्ट्रॅक्टरकडून(ठेकेदार) करवून घेणे, ब) स्वत: ( डु-इट-युवरसेल्फ) करणे.
पहिला अ प्रकारच भारतात प्रचलित आहे. यामध्ये ठेकेदार येतो,तुमच्या घराच्या भिंतींचे निरीक्षण करतो,तुम्हास कोणत्या प्रकारचा भारी/हलका रंग लावायचा आहे हे विचारतो, मापं काढतो आणि एस्टीमेट उर्फ खर्चाचा अंदाज सांगतो. हो म्हटल्यास थोडी रक्कम अडवान्स घेऊन साधारणपण चारचार दिवसात एकेक 'रूम' पूर्ण करतो. आणखी एक फाटा फुटतो तो म्हणजे पूर्ण कामच देणार का रंगसामान तुमचे, मजुरी आमची? इथे चक्रव्युहात फसण्याची शक्यता वाढते. वाघ्या म्हणा किंवा वाघोबा म्हणा तो खातोच.
प्रकार ब एवढा रुळला नाहीये. इंटरनेटवर यासंबंधी बरीच माहिती परदेशी साइट्सवर  उपलब्ध आहे. त्यांच्या आणि भारताच्या अर्थकारणात बराच फरक आहे. त्यांना निरनिराळी उपकरणं विकत घेऊनही काम स्वत: केल्यास फारच स्वस्त पडते.
रंगकामाचा प्रकार कोणताही असो त्यासंबंधी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहे.  मिसळपाव साइटवर गेल्या तीनचार दिवसांत "खरडफळ्यावर" थोडी प्रश्नोत्तरे झाली ती इथे येतीलच. शिवाय प्रतिसादांतून विचारलेल्या प्रश्नांतूनही अडचणी समजतील त्या कशा सोडवता येतील ते पाहू. सर्वांनीच आपापले अनुभव लिहिले की उत्तम संग्रह होईल.
१) रंग छान का वाटतो -
मुख्य म्हणजे रंगसंगती आणि रंगकामाचा सफाइदारपणा. शिवाय रंगाला व्यक्त होण्यासाठी जागा लागते ती आता कमी होत चालली आहे. खोल्या लहान आणि सामान वाढत आहे. मोठी कपाटं किंवा उंच फर्निचर- वॅाडरोबमुळे एक मोठा रंगवलेला चौकोन दिसतच नाही. घरात भरपूर प्रकाश येणे उत्तम.
काही जुन्या रंगसंगती
# हलक्या क्रीम कलरच्या भिंती + चेस्टनट ब्लॅकचे उभे खांब - केरळ स्टाइल.
# पांढरी भिंत, आणि छत यामध्ये ब्रेक करण्यासाठी वरचा नऊदहा इंचाचा ओरेंज पट्टा , ओरेंज खांब - पोंडिचरी कॅाम्बिनेशन
# खाली मातीचा रेडिश ब्राउन पट्टा ( लहान डेडो) वर पांढरा - गुजरातमधील गावात असतं तसं.
२) रंग खराब का दिसतो? / उठून का दिसत नाही?
-अपुरा प्रकाश. भिंतींचे प्लास्टर चांगले नसणे. भिंतींना ओल आल्याने पोफडे निघणे. रंगसंगती  चांगली न निवडणे. फर्निचर/पडदे यांच्याशी मॅचिंग न होणे. प्लास्टरिंगमधल्या कमी प्रतिच्या साहित्यामुळे रंग काळवंडतो - चमक जाते. इत्यादी. इलेक्ट्रिकल ओपन वायरिंग हे सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम असते. वायर्स तापत नाहीत परंतू रंगाच्या उठावात कमतरता आणतात. त्यावर प्लास्टिक केसिंग असले तरीही एक अखंड रंगीत चौकोन दिसत नाही.
३) रंग देण्याची प्रक्रिया  काय असते? किती तास लागतात?  किती रंग लागतो?
- सामान्यपणे भिंत विटांची, चुना/नेरु/सिमेंटची गिलावा केलेली, कोकण- केरळ किनारपट्टीला जांभ्या दगडाची असते. त्यावर चुना/नेरु/पिओपी ( जिप्सम)/ लांबीचा गिलावा (प्लास्टर) केले जाते. घासून गुळगुळीत केल्यावर त्यावर रंगाचे दोन हात (  coats) देतात. एका रंगकामाचे मेहनतीचे फक्त ( मध्यंतरी गिलावा/ रंग वाळण्याचे तास सोडून) चाळीस तास धरले तर त्यातले बत्तीस तास गिलावा करून भिंत 'तयार' करण्यात खर्ची पडतात, आठ तास रंगवण्यात. खडबडीत पृष्टभाग रंग अधिक "पितो", अधिक लागतो. दहा फुट x दहा फुट चौकोनाला एक ब्रास म्हणतात अशा खोलीत फरशी सोडून पाच ब्रास किंवा कमी जागा असते ( खिडक्या दरवाजांमुळे कमी). पाच किलो डिस्टेंपर, पाच किलो व्हाइटिंग पावडर,  लांबीसाठी अर्धा लिटर पांढरा ऑइलपेंट लागेल.
४) रंग म्हणजे काय? तो खराब का होतो?
-
अगदी थोडक्यात -
रंग/ पेंट =अ) कोणतीतरी टिकाऊ पूड किंवा माती ( पांढरी अथवा रंगीत ) +ब) चिकट द्रव्य /बाइंडर (नैसर्गिक किंवा कृत्रिम) + रंग द्रव्य / डाइ/ह्यू .
अ आणि ब यांवर किंमतीत फरक पडतो.
भिंत >> सिंमेटचा / चुन्याचा/पिओपी चा गिलावा केलेली
कोरडी/ भिजणारी/दमटपणा येणारी .
भिंती कोरड्या राहण्याची खात्री असल्यास महागडे रंग देता येतात. अन्यथा अक्रिलिक वॅाशबल डिस्टेंपर देणे उत्तम. डिस्टेंपरची एक नैसर्गिक मंद चमक असते ती कायम राहते. शिवाय रिपेअर लगेचच करता येतो. ओल्या भिंतीवरही रंग देता येतो.
रंगातली पांढरी पूड = पांढरी माती/क्ले > चुना पावडर >> शिंपले पावडर>>झिंक ऑक्साइड>>टाइटेनिअम ऑक्साइड अशी उत्तरोत्तर महाग होते. शिवाय ती किती बारीक चाळली आहे यावरही किंमत वाढते.
टाइटेनिअम वगळता इतरांस पिवळटपणा येतो. तो दिसू नये म्हणून नीळ( इंडिगो) अथवा कृ० जांभळा रंग ( फास्ट वाइलट) टाकतात.
मॅट अथवा ग्लोस फिनिश
अती बारीक सूक्ष्म मॅट फिनिश डोळ्यांस चांगला वाटतो तो डिस्टेंपरात नैसर्गिकच येतो. प्लास्टिक/इनेमल पेंटमधल्या बाइंडरमुळे आणि भुकटी बारीक असल्याने एक प्रकारची चकाकी( ग्लोस) रंगाच्या पापुद्र्यास येते ती ट्युबलाइटच्या प्रकाशात चमकते. तसं होऊ नये म्हणून रंग ओला असतानाच रोलर ( स्पंजचा) फिरवून मॅट फिनिश करावे लागते.
पाणी रंगाचा शत्रू आहे. पोफडे पडतात,रंगाचे पापुद्रे निघतात. पाणी पाझरून उडतो तेव्हा क्षार तयार होतात ते रंगाला भिंतीपासून दूर ढकलतात.
बाहेरच्या कंपाउंड वॅाल आणि इमारतीला दिला जाणारा सिमेंट पेंट आहे याचा मात्र पाणी मित्र आहे. पाण्यानेच तो अधिक घट्ट बसतो. तो भिंत ओली करूनच देतात. उन्हामुळे हा फिका पडतो. पण हा रंग फाइन नसतो. आतमध्ये देत नाहीत. बय्राच इमारतींच्या जिन्याच्या कोपय्रांत लोकांनी थुंकून घाण केलेली असते. अशा ठिकाणी त्यावर हा सिमेंट पेंट मारल्यास स्वच्छ जागा बघून तिथे कोणी घाण करत नाही. पाट्या आणि देवांची चित्रे लावण्यापेक्षा बरे.
आतील रंग खराब होण्याचे ओल येण्याचे कारण आहे त्याशिवाय एक म्हणजे रंगाला "घसट" असणे. हे सर्वांकडे असेलच असे नाही. भिंतीजवळ बेड असल्यास टेकून बसल्याने रंग जातो,तेलकटपणा येतो. खुर्च्या सरकवण्याने एका रेघेत खरडा निघतो. खिडक्यांचे लांब पडदे वाय्राने हलतात,रंगाला घासतात. लहान मुले भिंतींवर रेघोट्या ओढतात. रस्त्याजवळच्या शहरातल्या घरांत जी धूळ रंगावर बसते ती डिजेलमिश्रीत असते. ती एक वेगळाच चिकट काळपटपणा आणते.
५) भिंतींना  ओल येण्यामुळे रंग खराब होतो त्यावर काही उपाय करता येतील का?
ओल जिथून येते ती बंद करणे हा खरा उपाय असला तरी ती ओल बाजुच्या/वरच्या ब्लॅाकच्या बाथरुममधून होत असल्यास त्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपल्या बाजूने त्यावर येणारी बुरशी टाळण्यासाठी चुना वापरावा.
पिओपी आणि तयार पुट्टी यांच्या भलामण जाहिरातींतून चुन्याचे प्लास्टर असतं हे आपण विसरूनच गेलो आहोत.अजुनही काही दुकानांत ओल्या चुन्याची पाचपाच किलोंची तयार पाकिटे मिळतात.सर्व भिंतीला नाही पण कमीतकमी ओल येणाय्रा भागास हे प्लास्टर करून बुरशी नक्की थांबवता येते. बुरशीचा एक नंबर शत्रू.  चुना सेट होण्यास वेळ ( एक महिनासुद्धा) लागतो पण ढलपी अजिबात पडणार नाही. वरती मात्र साधा डिस्टेंपर रंग द्यायचा. ओल आल्यास तेवढ्याच भागाचा रंग निघेल पण पुन्हा लावणे अगदी सोपे.प्लास्टिक एनॅमलचा आख्खा पापुद्राच निघतो तसा नाही. एनॅमल पेंटचे कण भिंतींना जेवढे घट्ट धरतात त्यापेक्षा ते एकमेकांस अधिक घट्ट धरतात. डिस्टेंपरचे उलट असते.
सिलींग/ छतातून पाणी टपकत असेल तरी चुना पातळ करून रंगासारखा लावला तर पडणार नाही. शिवाय पांढरेपणा छान असतो.
आपल्याकडे डु-इट-युवरसेल्फ फार नाही पण काही सोपी कामे करायची तयारी ठेवली तर फारसं अवघड नाही.
पद्धत :
५-१) जिथे ओल येऊन पाणी  झिरपते तिथे रंग आणि प्लास्टर पडते आणि पांढरा बुरा दिसतो. पाण्यातले क्षार वाळतात. यास इफ्लोरेसन्सही म्हणतात.
५-२) बराचसा सैल भाग पत्र्याने( putty blade) काढून टाकायचा. ओल असल्याने यावर कोणताही प्राइमर बसणार नाही. सिमेंटचे पाणी/ पातळ सिमेंट ब्रशने लावायचे. सिमेंट पाण्यामुळेच पक्के होत असते आणि जुन्या भागास पकडते.
५-३) चुन्यात वाळू कालवून त्यावर लेवल करायचे.
भिंतीला सिमेंट पकडते आणि सिमेंटला चुना पकडतो.
५-४) यावर एक पांढरा डिस्टेंपर पेंट ( नेरोलॅक किंवा एशियन) लावायचा.
५-५) चुना न मिळाल्यास नेरू लावायचा.
सिमेंट विकणाय्राकडेच  "नेरू" नावाची पांढरी,मऊ,जड पावडर विकत मिळते. सिमेंट लावल्यावर या नेरूला ओले करून वर लावल्यावर सिमेंटचा काळेपणाही दिसत नाही. सिमेंट अधिक वाळू अधिक नेरू ओले करूनही लावता येते. दुसय्रा दिवशी डिस्टेंपर लावायचा.
( चुन्याचं काम करण्यावेळी एक सेफ्टी चष्मा हवाच. )
जेव्हा येणारी ओल ही बाहेरून पावसाने भिंत भिजल्यामुळे येते तेव्हा बाहेरूनही काही उपाययोजना करणे आपल्याला शक्य असते. परंतू ही ओल इमारतीच्या दुसय्रा ब्लॅाकच्या बाथरूमच्या पाणाच्या गळतीमुळे होते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. त्याने केलेले कन्सील्ड प्लंबिंग किंवा टाइलमधून पाणी झिरपत असते आणि तो ते तोडायला तयार नसतो.
आता हे माहित झाल्याने रंगाय्राने पैसे घेतले अन "चुना लगाया" असं कुणी म्हणणार नाही कारण याठिकाणी चुनाच तुमचे पैसे वाचवेल.
६) प्लास्टरिंग / गिलावा
६-१) विटांची भिंत असल्यास त्यावर सिमेंट अधिक नेरूचे प्लास्टर केलेले असते. सुरवातीस घरे बांधताना भिंती ओल्याच असतात त्यामुळे हे प्लास्टर महिन्याभरात घट्ट होते. ( setting.)
यावर पिओपी ( जिप्सम)चे प्लास्टर करून रंग देतात. हे पिओपी पंधरा मिनिटांत सेट होते त्यामुळे रंगारी यासच पसंती देतात. खोटे छत उर्फ फॅाल्स सिलिंगसाठी याचे नवनवीन डिझिइनचे तयार पाट ( बोर्डस) मिळतात ते वर छताला लावतात. सध्या कन्सील्ड इलेक्ट्रिकल वाइअरिंगचा जमाना आहे. तर या वायरी छतामध्ये लपवता येतात ( पंखा आणि सुशोभित लाइटिंगच्या केबल दिसत नाहीत.)
६-२) पूर्वी वाळूमिश्रीत चुन्याचे प्लास्टर केले जायचे. हे सर्वोत्तम समजले जाते कारण त्याचा पाणीविरोधकपणा आणि उष्णतेने भिंतीचे होणारे प्रसरण याशी मेळ खाते. बुरशीही वाढू देत नाही. परंतू आता ( १९७० नंतर) चुना प्लास्टर गायबच झाले आहे. चुन्याला घट्ट होण्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागतो. पण त्यानंतर तो कठीण आणि लवचिकही राहतो - भेगा पडत नाहीत.
इथे थोडी चुन्याची अधिक रंजक माहिती बघुया -
 कित्येक जुन्या महालांत आणि देवळांत चुन्याचा गिलावा करून त्यावर भित्तीचित्रे काढली आहेत. चुना हा नैसर्गिक स्वरुपात जमीनीत,खाणीत चुनखडीचे खडक ( कॅल्शम कार्बोनेट) म्हणून मिळतो. त्याचे मोठे तुकडे उंच भट्टीत तापवले की पाणी आणि कार्बनडाइअक्साइड वायू निघून जाऊन चुनकळी मिळते. वापरण्याच्यावेळी यात पाणी घातल्यावर पाणी उकळते आणि चुन्याची विरी ( स्लेक्ट लाइम) तयार होते. याचा लगदा खूप मळतात त्याचा गिलावा करतात. शंखशिंपल्यांतही चांगले कॅल्शम कार्बोनेट असते (मोत्यांमध्ये याहूनही शुद्ध असते.) असे बेटवा नदीतले शिंपले भाजून त्याचे प्लास्टर ओर्छा ( झाशीजवळ अठरा किमी) येथील महालांत केले आहे. लिंपल्यानंतर नदीतलेच गोटे घेऊन ते घोटून गुळगुळीत केले आहे. निरनिराळ्या गेरू,वनस्पतींचे रंग,कोळसा इत्यादी वापरून चित्रे काढली आहेत. ही सर्व चित्रे म्युरल्स प्रकारातली म्हणजे गिलावा वाळल्यावर काढलेली आहेत. ( परदेशातली अशी भित्तीचित्रे फ्रेस्कोज प्रकारची म्हणजे चुना ओला असतानाच काढलेली आहेत.)
केरळमधल्या देवळांत अशा चित्रांसाठी पांढरी माती वेलींच्या रसात वाटून लेप केला आहे. रंग नैसर्गिकच माती/वनस्पतींचे वापरले आहेत. इजिप्तमध्ये ज्या कबरी आहेत त्यातही सुंदर चित्रे आहेत.
६-३) लांबी प्लास्टर -
खरं म्हणजे लांबी/putty/filler हे भिंतीवरचे बारीकसारीक खड्डे भरण्यासाठी आहे परंतू याचा उपयोग एक प्लास्टर म्हणूनच रंगारी करतात. कारण काम उरकणे. यासाठी  व्हाइटिंग ( पांढरी/राखाडी शेडची शाडूची बारीक माती) वापरतात. तर ही व्हाइटिंग पाण्याने भिजवून नंतर ओइलपेंट घालून मळून लगदा बनवतात त्याचे प्लास्टर केल्याने एका दमात गिलावा आणि खड्डे बुजवले जातात. भिंतीवरचा अगोदरचा रंग पत्र्याने खरवडून काढल्यावर प्रथम प्राइमर रंगाचा एक हात ( coat) दिल्यावरच ही लांबी लावता येते. वाळल्यावर एमरी पेपर २२०ने घासून गुळगुळीत केले की रंगवण्यासाठी भिंत तयार होते. हीच लांबी दारे खिडक्यांच्या लाकडालाही वापरता येते. लांबी करताना सिमेंट प्राइमर,लिनसीड ओइल मिसळल्यास चमक येते पण कधीकधी रंग काळवंडतो.  क्वालटी चांगली हवी.
डिस्टेंपर लावणार असेल तर व्हाइटिंगमध्ये जो रंग देणार तोच मिसळायचा म्हणजे रंगाला मंद तजेला येतो.
७) कलर /शेड ठरवणे.
७-१)  एशिअन अथवा नेरोलॅक कंपन्यांचे कलर कार्ड मिळते. त्यातल्या सर्वच शेड सर्वच प्रकारच्या रंगांत ( डिस्टेंपर, प्लास्टिक,इमल्शन, वॅाटरबेस्ट, नॅान वॅाटर बेस्ट ) उपलब्ध नसतात. ज्या शेडस आहेत त्या ठरवल्यावर  त्या तिथेच दुकानामध्ये मिक्सरवर बनवून मिळतात. पुढेमागे रंग खराब झाल्यावर तो शेडचा नंबर सांगितल्यावर अचूक तोच रंग बनवून मिळतो. हा थोडा महाग पडतो. पेंटर लोक स्वत: हवी असलेली शेड बेस पेंटमधून बनवतात. यासाठी स्टेनर ( पातळ डाईज ५० -१०० एमएल बॅाटल्समध्ये मिळतात.) उदाहरणार्थ एक किलो डिस्टेंपर (६०रु किलो)मध्ये "फास्ट येलो ग्रीन" स्टेनरचे वीस थेंब टाकून ढवळून पोपटी रंगाची शेड मिळेल. डाइचे थेंब मोजून प्रथम कमीच टाकायचे. ते वाढवत गेले की गडद शेड मिळते. हे स्वस्त पडते. जेवढा रंग भारी तेवढे स्टेनरचे थेंब कमी लागतात हे लक्षात ठेवा. तयार मिक्सरचा रंग १००रु किलोने मिळतो. .
७-२) हा लेख लिहिण्याचे प्रयोजन ठरलेला प्रश्न - पांढरा {रंग/पेंट} कोणता लावावा?
- पांढय्रा पेंटमध्ये ज्या गिलाव्यावर लावला आहे त्यातल्या सर्व अशुद्ध अवांछित शेडस वर येणार आहेत. त्याची शुद्धिता फार महत्त्वाची आहे. अथवा ग्रेईश,पिवळसरपणा मिसळून अपेक्षित पांढरेपणा दिसणार नाही. पिओपीवर लावू नये हे माझे मत. बिरला पुट्टीवर एका ठिकाणी ट्राइ करून पाहा. चुना प्लास्टरवर फार पांढरे दिसेल परंतू भरड राहील.
८) हलका / भारी रंग
यात वापरलेली पूड आणि बाइंडरचा दर्जा यावर दर्जा ठरतो हे आपण पाहिलेच आहे. "कवरिंग पॅावर" भारी रंगाची अधिक असते म्हणून त्यासाठीचा गिलावाही अधिक फाइन करावा लागतो. अन्यथा योग्य परिणाम दिसणार नाही. दुसरी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे डिस्टेंपरला पाणी  घालून तयार केल्यावर चार तास ठेवल्यावर डब्याच्या तळाशी जाड रंग साठू लागतो तसे भारी रंगाचे होत नाही. दोन दिवसांनंतरही भारी रंगाचा  साका तळाशी जमत नाही.
८) आताच रंग लावून घेतला आणि पाचसहा महिन्यांत भिंतीला भेग पडली/ तळाकडून पाण्याने रंग सुटला पोपडे पडले/ बुरा धरला. काय करू?
ब्रशने पाणी लावून तो भाग भिजवायचा. पडणारा सुटा झालेला भाग,प्लास्टर काढून सिमेंटचेच पाणी /ओलसर सिमेंट ब्रशने चांगले चोपडायचे. चारपाच तासांनंतर सिमेंट अधिक नेरू अर्धे मिक्स करून लगदा करून भरायचा/फासायचा - थोडी लेवल करायची. यावर रंगाचा एक हात द्यायचा. दोन दिवसांनी दुसरा हात द्यायचा. अगोदरच्या रंगाच्या शेडचा नंबर माहित असल्यास तोच रंग एक किलो बनवून आणायचा. शेड नंबर माहित नसल्यास रंगाचा सुटलेला एक पापुद्रा दुकानात घेऊन जायचा. त्यांच्याकडे दोनतीन हजार शेडसचे कलर पुस्तक असते त्यातून मॅच करून लगेच शेड बनवून देतात. ९९टक्के काम होईल.
१०) लाकूड /लोखंडी वस्तुंचे रंगकाम
१०-१) फर्निचर
वर सांगितल्याप्रमाणे ओइलपेंट घातलेली लांबी लावून लेवल करायची. प्लाइवूडसाठी फेविकॅाल आणि प्लाइचेच पापुद्रे वापरून लेवल करायची. वर पुन्हा ओइलपेंट द्यायचा.
१०-२) लोखंडी वस्तू
उदाहरणार्थ पंखा किंवा कपाटाचा थोडासाच भाग खराब झाल्यास "कार पॅच" नावाची लांबी भरायची.( एक मिनिटात सेट होते,जलद काम करायचे.) हलकासा पातळ ओईलपेंट मारायचा.
हल्ली लोखंडी सांगाड्यांचे फर्निचर -बेड,शु रॅक वापरणे वाढले आहे. याच्या "पावडर कोटिंग"चे टवके उडून वाइट दिसते. तिथे कार पॅच लावून ३२० नंबर एमरी पेपरने घासून लेवल  करावे. वॅालनट/चेस्टनट ब्लॅा स्प्रे विकत मिळतो तो मारला की झाले.
१०-३) लाकडाचे पॅालिश
हे एकदाच करता येते. अगोदरचेच केलेले असेल तर पहिले पॅालिश पॅालिश -पेपरने संपूर्ण काढल्यावरच दुसरे चांगले बसते. नाहीतर चिकट होते. यासाठी एका बशीत डिनेचर्ड स्पिरिट(लाइसनशिवाय दुकानदार देत नाहीत) घेतात. दुसय्रा एका बशीत "रॅासेना नावाची पिवळी माती घेतात. कापडाची चिंधी स्पिरिटमध्ये आणि रॅासेनात बुडवून एकाच दिशेने लाकडावर फिरवायची.  संपले की पुन्हा घ्यायचा पण अगोदरच्या जागेवर पंधरा सेकंदानंतर हात फिरवायचा नाही. चिकट होईल. प्रॅक्टिस हवी. तयार टचवुडसुद्धा मिळते. लाख अधिक स्पिरिटही वापरतात. अजून एक चंद्रूस पॅालिश म्हणजे पाइनवुड झाडाचा गोंद उर्फ राळ स्पिरिटमध्ये भिजवून लाकडाला अथवा जांभ्या दगडाच्या भिंतीला -दगडाला लावता येते. चमक येते, आतला रंग खुलतो, पाणी लागत नाही.
१०-४) हल्ली लाकडी दारे खिडक्या जाऊन फ्लश प्लाइवुड आणि अलुमिनियमचा वापर वाढल्याने रंग द्यावा लागत नाही. अन्यथा लाकडी दरवाजे एकेक लिटर+ पेंट घेतात.
थोडीफार प्रॅक्टिकल माहिती दिली आहे. सूचना आणि प्रश्नांचे स्वागत आहे.
रंगाशी माझे दोन हात.
रंग माझा वेगळा.
*लेख लिहिण्यास उत्तेजन देणाय्रा सर्वांचे आभार. वाचकांनीही आपापले अनुभव अवश्य लिहावेत माहितीत भर घालावी.