गोवा - कुडाळ उडती भेट
२०१८-०३-१२~१५
गोवा म्हटलं की भारतीय आणि परदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण. समुद्रकिनारे,मासे,दारू, शिवाय निसर्ग आणि बोलके गोयकार हे चित्र समोर येतं. पण पहिल्या तीन गोष्टींचा काहीच संबंध नसल्याने तिकडे आतापर्यंत गेलोच नव्हतो. मग उरल्या दोनांसाठी एकदातरी गोव्याला जाऊ हा विचार गेले तीनचार वर्षं करत होतो. कुणा जाऊन येणाय्रास माहिती विचारली की "अरे हे करायचे नाही तर गोव्याला जातोसच कशाला?" असे उडवले जायचे. मग ठरवले की काही कुणाला विचारायचेच नाही. सरळ गोवा गाठायचे. सगळी माहितीपत्रके,नकाशे जमवले आणि एकट्याचेच तिकिट काढायचे ठरले. पायी भराभर फिरता येईल हा विचार.
"एकट्यासाठी रुम घेणारच तर मीही येते आणि पाहीन तुम्ही काय पाहता ते. चालेन मी. काढा दोन तिकिटं." मुकाटपणे रेल्वे टाइमटेबलं काढली.
कधी जायचं यावर ज्ञानात थोडी भर पडली की गोव्याचे वर्षभरात तीन सीजन आहेत. गर्दीचा हाई सीजन - नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मध्यम मिड सीजन - मार्च ते जून, खपाटीचा लो सीजन - जून ते ऑक्टोबर. मार्चवर बेत पक्का झाला. कायकाय पाह्यचं यावर रिटन तिकिटाची तारीख ठरणार होती. फोंडा/पोंडामधली मंगेशी,शांतादुर्गा इत्यादि देवळं मी धार्मिक/भाविक नसल्याने गाळून टाकली. जुना गोवा /पणजीमधली चर्चेस बघण्यात काही स्वारस्य नव्हते त्यामुळे तेही गाळले. उरली बीचेस. उत्तर गोव्यातली लोकप्रिय बीचेस/किनारे म्हपशाला जवळ. कोलवा बेनोलिम ही मडगावला जवळ. फक्त पाचसहा किमिवर. शिवाय मडगावला सर्व गाड्या थांबतात म्हणजे मडगावचे तिकिट काढायचे. अगोंडा,पालोळे अतिदक्षिणेस. बीच काय कोणतेही एक बीच पाहून काम भागणार होते म्हणजे मडगावला एक दिवस पुरेसा आहे. बाकी खाण्यापिण्याचे आकर्षण नव्हतेच. रेल्वेगाड्यांची मडगावला पोहोचण्याची वेळ पाहिल्यावर मुंबई - मंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस ( 11233 ) मडगावला सकाळी सातला पोहोचत असल्याने ती नक्की झाली. आता परतीचं काय करायचं? कुडाळजवळचे (!) तारकर्ली, धामापूर तलाव पाहायचे ठरले. दुसरे दिवशी बसने कुडाळला पोहोचून ( हॅाटेल रूम न घेताच) तिकडे जाऊन संध्याकाळची ट्रेन कुडाळहून पकडायची. राज्यरानी एक्सप्रेस/ आता नवीन नाव तुतारी एक्सप्रेस ( 11004 ) सातला आहे. ती ठरली. तसं या दोन गाड्यांची तिकिटेही मिळाली दीड महिना अगोदर. कोकणकन्या गाडीची कधीच संपतात चार महिने अगोदर. शिवाय कोकची पोहोचण्याची वेळ बरोबर नाही वाटली.
तारकर्ली आणि धामापूर याच ट्रिपमध्ये होणार होते. पुढच्या वेळेस म्हापसा - कलंगुट/ बागा/इतर बीच अधिक सावंतवाडी - आंबोली करता येईल हा विचार केला.
नेहमीप्रमाणे रेल्वे आरक्षण केले आणि हॅाटेलचे बुकिंग नाही. समजा जाणे रद्द केले तर फक्त रेल्वे तिकिटाचे पैसे वाया जातील. हॅाटेलचे नाही. शोधू तिकडे. सातला पोहोचणार म्हणजे भरपूर वेळ मिळेल.
तिकिटे,प्लान तर ठरला. विचार केला कोकणी थोडेफार शिकायला काय हरकत आहे? "अहो तिकडे मराठी,हिंदी,इंग्रजी सर्वांना समजते, कशाला कोकणीचा खटाटोप?" हा सल्ला धुडकावून युट्युबावर "learn Konkani" शोधल्यावर Saurabh आणि प्रताप नाइकचे व्हिडिओ सापडले. छान आहेत. goaholidays dot com >info>konkani इथेही आहे.
ठाण्याला रात्रीच्या चारपाच फास्ट लोकल ट्रेन्स गेल्यावरच एक्सप्रेस आली. एक फारनर जोडपे बसलेले. टिसीने त्यांचे इतिकिट पाहून "नो सीट!" सांगितल्यावरही काही खळखळ न करता गपचूप बसून राहिले. पुढे पनवेलला एका साइड अप्परवर दोघांना जागा मिळाली. काही गडबडगोंधळ न करता प्रवा कसा करायचा यांच्याकडून शिकले पाहिजे. त्या एवढ्याशा जागेत सहाफुटी दोघे बसून राहिले. प्रवासात बॅगांवर लक्ष ठेवण्यासाठी सावध राहावे लागते. ती काळजी डासांच्या फौजेने दूर केली. या मुंबईच्या गाड्या भायखळा जवळच्या वाडीबंदर साइडिंगला पडून असतात तेव्हा डास घुसतात. असो. गाडी रात्री फक्त रत्नागिरी, कणकवलीला थांबते आणि बाराला मंगलोरला, त्यामुळे पॅन्ट्री कार देण्याची तसदी रेल्वेने घेतली नव्हती.
आठला मडगावला पोहोचलो. पूर्वेकडे ( डावीकडे ) बस स्टँड मॅपमध्ये दाखवत असल्याने तिकडे बाहेर पडलो.
फोटो १
मडगाव परिसर
टॅक्सी/ओटोवाल्यांनी घेराव घातला पण त्यातून पुढे येऊन एका भरत आलेल्या टॅक्सीने (२०/-) KTC STAND - कदंबा ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या स्टँडला पोहोचलो. दोन किमि असेल. फार मोठा डेपो आहे.
"खयच्यांन आयतलान?"
"मुंबईच्यांन!"
- माझ्या कोंकणी अभ्यासाची परीक्षा एवढ्या लवकर सुरू होईल असं वाटलं नव्हतं. काल कोकणी
लेसनवाल्या सौरभला इमेल केला होता त्याचाही उत्तराचा इमेल आला होता.
"मुंबईच्यांन खयच्यांन?"
"डोंबिवली, कल्याण."
"औट ओफ मुंबई आसा ते!!" -"तुका हाटेल दाखवता"
मग त्याला कटवून डेपोत गेलो. चार टपय्रांत वडे समोसे बिस्किटे दिसली,चहा एकाकडेच होता. एक लांबलचक रांग कदंबाच्या पणजी बसची तिकिटे काढायला लागलेली. उद्या इकडेच उभे राहावे लागणार होते. रस्त्यावर इकडे तिकडे पाहिले तर बय्रापैकी स्वस्त राहण्याचे हॅाटेल आणि रेस्टारंटस दिसली नाहीत. एका बाइकवरच्या मनुष्यास विचारले बजेट हॅाटेल्स जवळ कुठे आहेत?आमच्या हातात बॅगा होत्याच.
"कुठून आलात?"
"आताच मडगावला उतरून इकडे आलो."
" फार फुडे आलात, मागे ओल्ड मार्केट गार्डन - कामत हॅाटेल स्टॅापला जा,तिकडे मिळतील."
जवळच ओटोरिक्षा रांग होती.
"कामत हाटेल, किती?"
"शंभर रुपय." (// हे अंतर एक किमि असेल.//)
"माका नाका."
"बस आसता. धा रुपय."
मग खासगी मिनिबसकडे आत गेलो. पाचपाच मिनिटाला मडगाव बस सुटत होत्या. धा रपयात गार्डनजवळच्या कामत हॅाटेलला आलो. या बसेसचे मालक पावलो/डकुन्हा/इत्यादि. डायवर क्लिनर बहुतेक मुसलमान असावेत.
कामत हॅाटेल स्टॅापला उतरल्यावर मी हॅाटेल शोधायला निघालो. एक मोठी नगरपालिका इमारत, बाजूला मोठी बाग, बागेभोवती छान रस्ता,स्टेट बँक,कॅनरा बँक, बँक ओफ इंडिया, गोवा टुअरिझमचे ओफिस/हॅाटेल, मार्केट,पेट्रोल पंप्स,शाकाहारी तीनचार रेस्टारंट्स पाहून लगेच लक्षात आल हा भाग मध्यवर्ती आणि वर्दळीचा आहे. एका पेपरवाल्याकडे कोकणी पेपर 'भांगरभूंय' मिळाला.
फोटो २
कोंकणी पेपर
इकडेतिकडे शोधल्यावर एक 'हॅाटेल दत्तराज' ( Duttraj ) दिसले. दोनबेड्स नान एसी ९५०/एसी १२००, गिजर,टिवी,बॅल्कनी, रुम छोटी पण चकाचक. लगेच घेतली. चेकआउट उद्या बारा वाजता!
(( Hotel DUTTRAJ, OPP. BANK OF INDIA, NEAR MUNICIPAL BLDG.,MADGAON 403601. PHONE 08322715046 / 9822120086 ))
रुमवर तयार होऊन बाहेर पडायला साडेदहा वाजले. जवळच्याच कामत हॅाटेलात भरपूर नाश्ता करून तिथे बाहेरच कोलवा बीचला जाणारी बस मिळते म्हणून उभे राहिलो. समोरच्या बागेतून पलीकडे जाणारी वाट आहे तिथे काजूफळे ( मुरटे/बोंडे) १०रु/४ मिळाली. मोठमोठे चिकू पन्नासला चार होते. हे घेऊन कोलवा बसमध्ये बसलो. (( कदंबा स्टँडसमोरच्या सरळ रस्त्याने कोलवा ५ किमि आहे.) इकडून जाणाय्रा बसेस बेनोलिमला वळसा घालून कोलवा बीचला जातात. ( १५रु/-) अगोंडा/वरका किंवा पालोलें बीचलाही जाणाय्रा बसेस भराभर सुटत होत्या. टोपी,टीशर्ट,हाफचड्डी,पायात चपला,खांद्यावर शबनम पिशवी घेतलेले फारनर याच बसमधून जात होते. रेल्वेवरच्या एका यु आकाराच्या ब्रिजवरून पलिकडे जाऊन वीसेक मिनिटांत बस कोलवा बीचला पोहोचली. रस्त्याने दोन्ही बाजूस रंगीत टुमदार विला,भरपूर झाडे असं छान दृष्य दिसते. समोर अफाट पसरलेला शुभ्र वाळूचा किनारा, दोनतीन फुट उंचीच्या लाटा. काहीजण पोहताहेत. मार्च महिन्याचे दुपारचे बाराचे ऊन. वॅाटर स्कुटर, पॅरासेलिंगसाठी , पोहण्यासाठी वेगवेगळे भाग करून ठेवलेले. कडेला झावळ्यांनी शाकारलेली रेस्टारंटे. सावलीकरता नारळाची भरपूर झाडे. मजा वाटली. दोनला
परत येऊन आराम केला.
फोटो ३
फोटो ४
कोलवा बीच - पॅरासेलिंग
फोटो ५
मडगाव नगरपालिका वाचनालय इमारत
फोटो ६
नगरपालिका बागेजवळचा रस्ता, बस स्टॅाप.
संध्याकाळी मडगाव मार्केट भाग फिरलो. काही दुकाने तिथल्या होळी ( गंजीमली असं काही नाव कळलं)निमित्ताने बंद होती. कपड्यांच्या दुकानांत फारनर जात होते. इकडे स्टॅापवर एक कदंबा बस आली त्याच्या कंडक्ट्ररला विचारले "सकाळी सावंतवाडीला जाण्यासाठी बस कुठे मिळेल?"
"स्टेट बँकेपाशी सकाळी सहा ते सात वेळात येतात बस. कंकोळ्ळी- बांबोळी- मडगाव-पणजी."
चला एक काम झाले. KTC स्टँडला जायला नको. बागेत बसलो. बाग अतिशय फुललेली होती. सुंदर. फोटो,विडिओ काढले. मग रूमवर परतलो.
फोटो ७
नगरपालिका बाग -१
फोटो ८
नगरपालिका बाग - २
फोटो ९
नगरपालिका बाग - ३
फोटो १०
शिमगोत्सवानिमित्त प्रदर्शन, पणजी डेपोसमोर - १
(( काही फोटो व्हिडिओतून सेव केल्याने कमी रेझलुशनचे आलेत.))
आजचा दिवस आरामात काढला. एकूण मडगाव परिसर, वाहन व्यवस्था, हॅाटेल, रेस्टारंटस याची कल्पना आली.
दुसरे दिवशी सकाळीच तयार होऊन सहाला स्टेट बँकेपाशी आलो. तिथे टपरीवर चहा वडा घेतला आणि कदंबाची पणजी ( उच्चार पों-ण-जीं) बस आलीच. ऐसपैस मोठी बस. तासाभरात पणजीला पोहोचलो. डेपो थोडा गावाबाहेर वाटला. मेट्रोचं काम चालू होतं. समोर होळीचे पुतळे लावलेले.
एका डायरेक्ट म्हापसा बसने म्हापसाला गेलो. तिथून मडगाव-सावंतवाडी-बेळगाव जाणाय्रा कदंबा बसने सावंतवाडीला पोहोचलो. मागेच कुडाळ बसही होती. कुडाळला साडेअकरा झाले. प्रवास छान झाला. कुडाळात बुधवारचा बाजार असल्याने गर्दी खूप होती. नाश्ता करून परत डेपोत आलो. डेपो फारच लहान आहे. शाळेच्या मुलांची गर्दी. मालवणला तारकर्ली जाण्याचा प्लान रद्द केला. इथे स्कुबा डाइविंग आहे पण ते करणार नव्हतोच शिवाय आता फारच उकडत होते. पुन्हा बीचसाठी कशाला जा म्हणून फक्त धामापूर जाऊन येण्याचे ठरवले.
लवकरच मालवण जाणाय्रा दोन बस आल्या त्यात एक धामापूरमार्गे होती त्याने वीस मिनिटांत तलावाच्या स्टॅापला उतरलो. बाजूलाच सातेरी देवी मंदिर आणि तलावाचा दक्षिण भाग आहे. तिथे वेळ घालवण्यासारखं काही नाही. रस्यावरच्या हॅाटेलवाल्याला विचारलं "इकडून काळसे गावाला जाऊन नदी ओलांडायला होडी असते का?"
"कशाला?"
"वालावलला जायचय."
"आता होड्या( तर) बंद झाल्या. बसनेच मागे जा आणि जकातनाक्याला उतरा. तिथे बस बदला."
मग लगेच तिकडे गेल्यावर वालावलची बस मिळून नारायण /रवळनाथ देवळापाशी उतरलो तेव्हा एक वाजला होता. दोन्ही देवळे छान आहेत आणि येणाय्रा पाडव्याच्या दहा दिवसांच्या उत्सवासाठी सजावट करत होते. नारायणाच्या देवळामागे भक्तनिवासही दिसले आणि करंबेळकरांकड जेवणाचीही व्यवस्था झाली. मागचा छोटासा तलाव रम्य आहे. गावातून खाली गेल्यावर कर्ली नदी/खाडी आहे तिथे तासभर बसलो. दोन्ही तिरांवर माडाचे वन आहे. या खाडीलाच आता बॅकवॅाटर म्हणतात. त्यात बोटी फिरवतात. ही जागाही खूपच रम्य आहे. जवळच स्टेट बँकेची शाखा आहे. या मार्गावर एसटी बसेसही बय्राच झाल्या आहेत. रोज वीस बस. चारची बस पकडून कुडाळला आलो.
फोटो ११
शिमगोत्सवानिमित्त प्रदर्शन, पणजी डेपोसमोर -२
फोटो १२
धामापूर तलाव ( कुडाळ - मालवण रस्ता)
फोटो १३
धामापूर, सातेरी मंदिर मंडप
फोटो १४
वालावल तलाव
थोडीफार खरेदी करून रेल्वे स्टेशनला ओटो रिक्षाने (४०/-) आलो. अंतर थोडेच आहे,चालतही जाता येण्यासारखे. सातच्या तुतारी एक्सप्रेसचे तिकिट होते आणि गाडी वेळेवर आली. ही मागच्या सावंतवाडीहूनच सुरू होते पण मालगुंडच्या कुशवसुतांच्या तुतारी कवितेचे नाव गाडीला दिले आहे बहुतेक. प्रत्येक राज्यात एक राज्यराणी गाडी आहे आणि ते हवे ते नाव बदलू शकतात. ही खरी कोकणची गाडी आहे. गाडीला पॅन्ट्री कार होती आणि जेवण चांगले होते. गाडी वेळेत ठाण्याला पोहोचली.
फोटो १५
गोवा टुअरिस्ट मॅप V
फोटो १६
गोवा टुअरिस्ट मॅप H
फोटो १७
कुडाळ एसटी डेपो वेळापत्रक फलक
युट्युब व्हिडिओ लिंकस
१) कोलवा बीच पॅरासेलींग
File size 146 MB
2 minutes
वि लिंक:https://youtu.be/uGPkDzY126k
२) कोलवा बीच ते मडगाव बसमधून
फाइल साइज 137 MB,
2 minutes
Link:https://youtu.be/B5U02MIA4Tc
एकूण गोवा ट्रिप फारशी अपेक्षा न ठेवल्याने फळली. गोव्याचे वातावरण,लोक,निसर्ग आवडला आणि पुढच्या खेपेस चारपाच दिवस राहायचे नक्की करून टाकले.